टाटा ट्रस्ट, गुगल इंडिया आणि सकाळ सोशल फौंडेशन, तनिष्का व्यासपीठ यांच्यातर्फे राज्यातील तीन हजारापेक्षा जास्त गावात डिजीटल परिवर्तन सुरू आहे. स्मार्ट फोनने ग्रामीण स्त्रियांच्या आयुष्यात बदल केले आहेत. त्यांना माहितीच्या अमर्याद खजिन्याच्या जणू चाव्याच मिळाल्याचा आनंद आहे. या बदलाची कहाणी…
सुरेखा बोळंगे, लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील कवठळी गावात शिवणकाम करीत असे. इंटरनेट साथीमुळे इतर स्त्रियांचे यू टुबवर व्हिडिओ पाहून प्रेरणा मिळाली. शिवणकामात नवनव्या फॅशन तिने आणल्या. तिचं उत्पन्न तर तिप्पट, चौपट झालंच, शिवाय चारजणींना तिने रोजगार दिला.
वंदना थोरात, हिंगोली जिल्ह्यातील तोंडापूरच्या . परिस्थितीशी दोन हात रोजच करावे लागत. घरादाराला जगवण्यासाठी शेतात काम करीत . इंटरनेटच्या माध्यमातून सरकारी योजनांची माहिती मिळाली आणि त्यांनी म्हैस घेतली. पुढे शेणखत विकलं. शेतीत सुधारणा केल्या. ट्रॅक्टर घेतला. कृषि विज्ञान केंद्राची मदत घेतली. जोड व्यवसाय उभारले. आता मुलं उच्च शिक्षित आहेत.
सरोज देशमुख, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या. इंटरनेट साथी म्हणून काम करताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींना त्यांनी सरकारी योजनांचा फायदा मिळवून दिलाच शिवाय शिरसगाव-पांढरीतील पारधी वाड्यांवर जाऊन प्रबोधन केले. चुरमुरा गावात दारूभट्ट्या केल्या. दारू गाळणाऱ्या महिलांच्या हातातत शिवणयंत्र दिली.
अशा शेकडो यशोगाथा गेल्या दीड वर्षांत इंटरनेटच्या माध्यमातून साकारल्या आहेत. अमिता, जयश्री, गीता, अपर्णा, वंदना…अशा हजारो जणी राहतात लहानशा खेड्यामध्ये. काहीजणींनी नव्याने व्यवसाय सुरू केले, तर काहींनी पूर्वीच्या व्यवसायाला तंत्रज्ञान, स्मार्ट फोनच्या मदतीने झळाळी दिलीय. काहीजणींनी रोजचे जगणे रंगतदार केले. तंत्रज्ञान-इंटरनेटने ही किमया केलीय. असे डिजीटल परिवर्तन देशातील 17 राज्यातील एक लाख 70 हजार गावांमध्ये गेल्या चार वर्षांत घडले आहे. टाटा ट्रस्ट आणि गुगल इंडिया यांच्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या “इंटरनेट साथी’ या प्रकल्पाने ग्रामीण स्त्रियांना माहितीचे जग खुले केले.
समान संधी
ऑनलाईन लोकसंख्येत जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. त्यात महिलांचे प्रमाण 30 टक्के., ग्रामीण महिलांचे प्रमाण फक्त 12 टक्के, इतके कमी. 2015 मध्ये दहाजणींपैकी फक्त एकच महिला ग्रामीण भागात इंटरनेट वापरत होती. टाटा ट्रस्ट आणि गुगलने हे चित्र बदलायचे ठरवले. शहरी आणि ग्रामीण असा फरक कमी करायचाच होता, त्याचबरोबर स्त्रियांचे दुय्यमत्त्व कमी करायचे होते. लिंगभावाच्या (जेंडर) दृष्टीकोनातून ग्रामीण स्त्रियांना माहिती घेण्याची संधी त्यांनी दिली. डिजीटल साक्षरतेबरोबरच डिजीटल माध्यमातून अर्थार्जनाच्या संधीही मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. आता दहापैकी तिघीजणी स्मार्ट फोन वापरतात.