सामाजिक बदल घडवण्याच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेणे, या विचारातून तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान ह्या उपक्रमाची निर्मिती झाली. या उपक्रमाचे ध्येय होते, महाराष्ट्र राज्यभर पसरलेले, केवळ महिलांचे हक्काचे व्यासपीठ निर्माण करणे.
सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अभिजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून या उपक्रमाची सुरुवात झाली. ११ एप्रिल, २०१३ ला, गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारून या उपक्रमाची सुरुवात झाली. कोल्हापूर पाठोपाठ राज्यात इतर ६२५० ठिकाणी ही स्त्री प्रतिष्ठेची गुढी उभारली गेली. १५०० सदस्यांपासून सुरुवात करून, केवळ ९ महिन्यांच्या कालावधीत तनिष्का व्यासपीठाने जवळपास ११०,००० सदस्यांचा पल्ला गाठला आहे, आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढतेच आहे. महाराष्ट्र राज्यात काही गावे ‘तनिष्का ग्राम’ देखील ठरली आहेत. या गावांमधल्या प्रत्येक कुटुंबातील एक तरी स्त्री तनिष्का सदस्या आहे.
सुरुवातीच्या काळात तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या गटांना चालना देण्यात आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात ‘सकाळ’ च्या १७०० वार्ताहरांनी योगदान दिले. यथावकाश या तनिष्का गटांनी त्यांच्या स्थानिक पातळीवरील विकासकामात प्रचंड महत्वाची भूमिका बजावलेली आहे. अतिशय कमी कालावधीत साकार झालेल्या १५,००० याशोगाथांनी या व्यासपीठाची ताकद लक्षात येते. गावापर्यंत पाणी आणणे असो, महिलांना जमिनीच्या मालकी हक्कात सामील करून घेणे असो, किंवा डॉक्टरदेखील न पोचलेल्या गावांमध्ये आरोग्यासाठी सुविधा निर्माण करणे असो, ही प्रत्येक यशोगाथा स्थानिक तनिष्का गटाचं कर्तृत्व अधोरेखित करते.
तनिष्का व्यासपीठाची ठळक वैशिष्ट्ये:
- तळागाळापर्यंत पोहोचलेले व्यासपीठ
- व्यासपीठात महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हे आणि त्यातील प्रत्येक तालुक्याचे प्रतिनिधित्व
- सध्या जवळपास ११०,००० सदस्यांच्या सहभाग
- वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक
- अल्पसंख्यांक, मागास आणि आदिवासी समाजातून देखील सहभाग
- शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही समुदायांचे प्रतिनिधित्व
- २० सदस्यांचा एक, अशा गटांद्वारे कामकाज
- सकाळने उपलब्ध करून दिलेल्या कॉल सेंटर द्वारे २४*७ संपर्कात रहायची सोय
- मुळापासून सामाजिक बदल घडण्याची अनेक उदाहरणे