पर्यावरणाची जपणूक
तनिष्कांनी गेल्या राज्यात सुमारे चार लाख झाडे लावली. त्यातही वेगळेपण जपले. लक्ष्मी तरूसारख्या तेलबिया देणाऱ्या झाडाचा प्रसार तनिष्का करतात. वटपौर्णिमेला दरवर्षी एखादी वेगळी कल्पना राबवतात. आशिया खंडातील आकाराने मोठ्या असलेल्या म्हसवे (जि. सातारा ) येथील वडाच्या झाडाची रोपे राज्यभर तनिष्कांनी लावली आहेत. नाशिक जिल्ह्यातील बिरोळे (ता. नांदगाव) चे नाव मोठे झाले आहे. तेथे तनिष्का सदस्या सरपंच, उपसरपंच असताना वाळू उपसा पूर्ण थांबवून नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. शेती फुलली. गावाचे अर्थकारण बदलले आणि स्थलांतर रोखले गेले.
शेती झाली फायद्याची
शेतीतील स्त्रियांचे कष्ट फारसे लक्षात येत नाहीत. काही गावातील तनिष्कांनी हे चित्र बदलले. भोसे, करकंब, बार्डी ( जि. सोलापूर)येथील तनिष्कांनी जी. फोर वाणाच्या मिरचीचे पीक घेऊन ती परदेशात पाठवून एकरी 50 हजार रूपये कमावले. पुढे कोणी फळबागा, ऊसाचे पीक घेऊन घराचे आर्थिक चित्र बदलले. सोलापुरातील बोरामणीत तनिष्का सेंद्रिय शेती करून भाजीपाला मुंबईला पाठवतात. लोकमंगल बॅंकेने बोरामणीत दहा हजार रूपये 100 तनिष्कांना देऊन त्यांच्यातील उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले आहे. टाकळी सिकंदर (सोलापूर) मध्ये 40 तनिष्कांनी एकत्र येऊन डेअरी सुरू केली. गावाचे अर्थकारण बदलण्याची जिद्द त्यांच्यात आहे. जळगाव, बीड जिल्ह्यात माती परीक्षणात तनिष्कांनी स्वतःखेरीज सातशे शेतकऱ्यांना सहभागी करून कृषि आरोग्य पत्रिका तयार केली. खतांचा अनावश्यक वापर टाळून उत्पादन वाढायला मदत झाली. गट शेतीचे प्रयोगही सातारा, रत्नागिरीत झाले. शेतीतील असे निर्णय घेऊन तनिष्का आर्थिक पत आणि प्रतिष्ठा मिळवत आहेत.
प्रत्यय संवेदनशीलतेचा, सहवेदनेचा
जळगाव जिल्ह्यातील कंडारीत तनिष्कांनी अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी चारशे घरे उभारण्यासाठी सलग दोन वर्षे कष्ट घेतले. सुमारे दोन ते अडीच हजार जणांना हक्काचा निवारा मिळाला. खडकेसीम (ता. एरंडोल, जळगाव), मातोरी (बीड)त मिळून सव्वातीनशे घरांवर स्त्रियांचे नाव हक्क म्हणून लागले. पाचोरा(जळगाव)येथे तनिष्का सल्ला केंद्र चालवतात. त्या माध्यमातून 52 कुटुंब मोडता मोडता सावरली. जळगाव, पुण्यात मिळून सहा बालविवाह रोखण्यात तनिष्कांना यश आले. हगनदारीमुक्त गाव करताना तीन तनिष्कांनी प्रसंगी मंगळसूत्र विकले. बोरामणी, केकतउमरा (वाशिम), टाकळीसिकंदर येथे किमान आठशे वैयक्तिक स्वच्छतागृह तनिष्कांच्या पुढाकाराने उभारली. आरोग्याच्या समस्या तर त्यामुळे सुटल्याच, पण स्त्रीसुरक्षितता आणि स्त्रीप्रतिष्ठा मिळवून दिली. दाभाडी (यवतमाळ), तुंग( सांगली), वसंतनगर तांडा(बीड), चिचोंडी( नाशिक) अशा सात- आठ गावात दारूबंदीची जोरदार मोहीम तनिष्कांनी हाती घेतली. कोल्हापुरात साखर कारखाने असलेल्या भागात वाहनांना रिफ्लेकटर लावून वर्षभरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले. रस्ते, पाणी, रेशन आदी नागरी प्रश्नांची सोडवणूक झाल्याची अक्षरशः शेकडो उदाहरणे आहेत. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची तर काही गावात प्रथाच पडली आहे.
या सगळ्या कामांमुळे तनिष्का व्यासपीठाच्या उपक्रमाची उत्सुकता देश पातळीवर आहे, तशी जगातही. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर याबाबत आवर्जून विचारतात. म्हणूनच संघटित झालेल्या स्त्रीशक्तीसाठी नेतृत्व, क्षमता विकासाचे कार्यक्रम राबवत आहोत. तनिष्कांच्या माध्यमातून आकाराला आलेल्या उपक्रमांतून त्यांची कर्तबगारी समोर आली. सकारात्मक , परिणाम घडवणारा गट म्हणून तनिष्कांची ओळख आहे. समाजोपयोगी कामामुळे स्त्रियांना तनिष्का व्यासपीठाच्या कामातून प्रतिष्ठा मिळाली आहे. या उपक्रमांत महाराष्ट्रातील स्त्रियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करीत आहे.