पुणे, “कोण म्हणतं आपल्या देशात उद्योग-व्यवसायाला संधी नाही ? नव्या कल्पना योग्यरित्या राबवल्या तर तुमच्या उत्पादनाला मागणीच मागणी येऊ शकते. त्यामुळे तुम्ही महिला देशाची बाजारपेठ जिंकू शकता”, अशा शब्दांत मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, रूरल रिलेशन्सचे प्रमुख प्रदीप लोखंडे यांनी तनिष्का सदस्यांना प्रेरणा दिली. अख्ख्या न्यूझीलंड देशापेक्षा आपल्या पुणे शहराची लोकसंख्या अधिक आहे, सगळ्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा उत्तर प्रदेशात अधिक लोक राहतात. त्यामुळे बाजाराची चिंता तुम्ही करू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोखंडे यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी विविध विषयांवर तनिष्का सदस्यांना मार्गदर्शन केले. प्रेरणा दिली. निमित्त होते “तनिष्का संवाद’ 2019चे. माहिती आणि मनोरंजनावर आधारित दिवसभराचे संमेलन चार डिसेंबर रोजी तनिष्का व्यासपीठातर्फे उत्साहाच्या वातावरणात साजरे झाले. “सकाळ’ चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार , प्रदीप लोखंडे, “सकाळ’चे सीइओ उदय जाधव, “लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे विभागीय अधिकारी सुशील जाधव, “सोहम उद्योग’चे प्रमुख विनय गरगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उदघाटन झाले. त्यापूर्वी डॉ. मैत्रयी निर्गुण आणि समृद्धी पुजारी यांनी नृत्यातून गणेशवंदना सादर केली. तनिष्कांना देशी झाडांच्या बारा लाख बिया मोफत पुरवल्याबद्दल वृक्षमित्र महेंद्र घागरे यांचा सत्कार करण्यात आला.