तनिष्का सदस्यांसाठी आयोजित केलेली आरोग्यशिबिरे राज्यातील स्त्री आरोग्याचे वास्तव सांगणारी आहेत. 70 हजार तनिष्कांच्या
आरोग्य तपासणीखेरीज तेवढ्याच अन्य स्त्रियांच्या तपासणीतून हिमोग्लोबीनच्या कमतरतेचा प्रश्न समोर आला. तज्ञ डॉक्टर मंडळींच्या सहभागाने त्यावर मात करण्यासाठी कल्पक उपक्रम राबवण्यात आले. मोफत तपासणीत सुमारे पन्नासजणींना कर्करोगापासून वाचवण्यात यश आले. दहा हजार तनिष्कांच्या कुटुंबियांच्या मोतीबिंदूच्या तपासणीत खानदेशात वेगळे निरीक्षणही आढळले. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, बोऱ्हाडीत , जळगावातील पाचोरा, भडगाव येथे पाण्यातील क्षारांमुळे डोळ्यांचे, पोटाचे आजार वाढल्याचे समोर आले. सरकारी आरोग्य यंत्रणेला यापूर्वी त्याची कल्पना नव्हती. तनिष्कांमध्ये आरोग्यभान वाढले, त्याचबरोबर भगिनीभावही. एखादीला कर्करोग झाल्याचे लक्षात आल्यानंतर धीर द्यायला, मदतीला इतर तनिष्का सदस्या पुढे येतात. एखाद्या गरजू रूग्णाला रक्ताची, आर्थिक मदतीची गरज असेल, तर तनिष्का सोशल मिडियाचा प्रभावी वापर करतात.