तनिष्कांनी हाती घेतलेले उपक्रम विविध स्वरूपाचे आहेतच, पण त्याची व्याप्ती मोठी आहे. तनिष्कांनी एकत्र येऊन केलेल्या कामाचा फायदा मोठ्या जनसमुदायाला होतोय, याची हजारो उदाहरणे आहेत. त्यातील काही ठळक उपक्रम दखल घ्यावे असे आहेत. तनिष्कांना या कामांमध्ये “सकाळ’च्या बातमीदारांची साथ असते. सकाळ, साम, स्वतंत्र वेबसाईटमधील प्रसिद्धीचं पाठबळ आहे. संपर्कासाठी कॉल सेंटरची सोय आहे. प्रशिक्षण कार्यक्रम आहेत. अनेक मोठ्या संस्था, तज्ञमंडळी “सकाळ’बददलच्या आपुलकीतून तनिष्कांना सहकार्य करण्यास तयार झाली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने राज्यातील काही गावे दत्तक घेतली आहेत. तनिष्कांच्या मदतीने त्या गावांचा कायापालट सुरू आहे. सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातून तनिष्कांनी केलेली शिफारस आणि इतर निकषांवर सुमारे 350 गावांत गाळ काढण्याची कामे झाली, त्यातून हजारो कोटी लिटर पाण्याची साठवणक्षमता निर्माण झाली. या गावांतील टंचाई दूर होण्याबरोबरच लोकसहभागाची चळवळच उभी राहिली. गावागावात मिळून हजारो ग्रामस्थ सहभागी झाले. लोकवर्गणी, इंधनाची मदत, श्रमदान या सगळ्याचे एकत्रित मूल्य किमान 100 कोटी होईल. पाणलोट विकासाची जोड या कामांना दिल्याने या गावांची शेती फुलत आहे. अर्थकारण बदलल्याचे पाहायला मिळेल. तनिष्कांनी गाळ काढतानाचा मुरूम वापरून तीन ठिकाणी एक ते तीन किलोमीटरचे रस्ते तयार केले. त्या त्या गावांचे विकासाचे ते रस्तेच झाले. जळगाव जिल्ह्यातील पेंडगावमध्ये सलग 32 वर्षे सुरू असलेला टॅंकर बंद झाला. यानिमित्ताने तनिष्कांना, ग्रामस्थांना काही गावांतील जुने वाद मिटवण्यात यश आले. कावळवाडी ( ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील रस्त्याचा 66 वर्षे सुरू असलेला वाद संपला. जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष गावाकडे गेले. त्यांनी गावाला भेट देण्याबरोबरच रस्त्यासाठी आठ लाख रूपये मजूर केले. गावाला सौरदिवे मिळाले. चिचोंडी ( ता. येवला, जि. नाशिक) येथे 25 वर्षे रखडलेला पाटरस्ता तनिष्कांच्या पुढाकाराने पूर्ण झाला. पाचशे शेतकऱ्यांना त्याचा रोजचा फायदा झाला. बीड जिल्ह्यात श्रीपतरायवाडीत पाण्याचा ताळेबंद (बजेट) मांडला तनिष्कांनीच…पाणी आणि प्रगतीचे नाते तनिष्कांच्या पुढाकाराने फुलत आहे. सरकारच्या जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी उपक्रमांत त्या सक्रिय सहभागी झाल्या .