देशाची बाजारपेठ तनिष्का नक्की जिंकू शकता !

null

मार्केटिंग तज्ञ प्रदीप लोखंडे यांचा विश्‍वास

पुणे, “”कोण म्हणतं आपल्या देशात उद्योग-व्यवसायाला संधी नाही ? नव्या कल्पना योग्यरित्या राबवल्या तर तुमच्या उत्पादनाला मागणीच मागणी येऊ शकते. त्यामुळे तुम्ही महिला देशाची बाजारपेठ जिंकू शकता”, अशा शब्दांत मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, रूरल रिलेशन्सचे प्रमुख प्रदीप लोखंडे यांनी तनिष्का सदस्यांना प्रेरणा दिली. अख्ख्या न्यूझीलंड देशापेक्षा आपल्या पुणे शहराची लोकसंख्या अधिक आहे, सगळ्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा उत्तर प्रदेशात अधिक लोक राहतात. त्यामुळे बाजाराची चिंता तुम्ही करू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोखंडे यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी विविध विषयांवर तनिष्का सदस्यांना मार्गदर्शन केले. प्रेरणा दिली. निमित्त होते “तनिष्का संवाद’ 2019चे. माहिती आणि मनोरंजनावर आधारित दिवसभराचे संमेलन चार डिसेंबर रोजी तनिष्का व्यासपीठातर्फे उत्साहाच्या वातावरणात साजरे झाले. “सकाळ’ चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार , प्रदीप लोखंडे, “सकाळ’चे सीइओ उदय जाधव, “लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे विभागीय अधिकारी सुशील जाधव, “सोहम उद्योग’चे प्रमुख विनय गरगटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उदघाटन झाले. त्यापूर्वी डॉ. मैत्रयी निर्गुण आणि समृद्धी पुजारी यांनी नृत्यातून गणेशवंदना सादर केली. तनिष्कांना देशी झाडांच्या बारा लाख बिया मोफत पुरवल्याबद्दल वृक्षमित्र महेंद्र घागरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी “सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार म्हणाले, “”तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून राज्यभरातील महिलांनी एकत्र येऊन अनेक प्रकल्प राबविले आहेत. या कामांतून यशोगाथा निर्माण झाल्याने समाजाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. महिलांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण होण्यासाठी तनिष्का व्यासपीठाची सुरवात झाली . महिलांच्या क्षमता- व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध उपक्रम-प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. डिजिटल युगात होत असलेल्या वेगवान बदलांमुळे, आपण जे शिकलो त्यात आणि सद्यस्थितीत जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. त्यामुळे प्रशिक्षण आवश्‍यक आहे. यासाठी इस्त्राईलचे उदाहरण अनुसरण्यासारखे आहे. तिथे विद्यार्थ्यांमध्ये प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी मुद्दाम अवघड परीक्षा घेण्याचे धोरण राबविले जाते. अनेक विद्यार्थी प्रारंभी अनुत्तीर्ण होतात. त्यांनी खूप कष्ट केल्यानंतरच परीक्षेत यश मिळते. तेथे हे अपयश साजरे केले जाते. त्यामुळे मानसिक व शारीरिक क्षमता वाढते. आपल्याकडेही अशी क्षमता वाढविण्याची गरज आहे ”
लोखंडे आणि अभिजित पवार यांना तनिष्का सदस्यांनी व्यवसाय- मार्केटिंग याविषयी अनेक शंका-प्रश्न विचारले. त्यावेळी दोघांनीही मार्गदर्शन केले. व्यवसायासाठीच्या अनेक टिप्स ऐकताना तनिष्का गुंगून गेल्या होत्या. व्यवसाय करताना केवळ कल्पना चांगली असणे पुरेसे नाही, तर ज्या चुका होतात, त्यांच्यात सुधारणा केली तरच यश मिळते, असा सल्लाही पवार यांनी दिला.

“उगीच कशाला ? टाळा
..आणि अपयश साजरे करा !
संमेलनात तनिष्का सदस्यांमध्ये दोन नव्या कल्पनांची चर्चा चांगलीच रंगली. प्रदीप लोखंडे यांनी व्याख्यानात कोणतीही नवीन गोष्ट करताना “उगीच कशाला हे करायचे ?’ असे अनेक जण ऐकवतात. पण आयुष्यात पुढे जाण्यासाठी हे शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका, असे सांगितले . बहुतेकजणींना त्याचा अनुभव असल्यामुळे ते पटले. त्याचबरोबर अभिजित पवार यांनी “अपयशसुद्धा साजरे करा’, आणि यशाकडे चला, अशा शब्दात प्रेरणा दिली. त्यावर तनिष्कांनी अपयशाची आमची भीती जणू पळून गेलीची भावना व्यक्त केली.

सकारात्मक वृत्ती यशाची गुरूकिल्ली
समाजात, व्यवसायात वेगळे काही करू बघणाऱ्या तनिष्कांना “मजेत जगावं कसं ?’ या विषयावर प्रेरक लेखक शिवराज गोर्ले यांनी मार्गदर्शन केले. “”कोणालाही आपल्या आयुष्याशी देणे घेणे नसते. तरी लोकांना काय वाटेल याचा विचार आपण करत बसतो. स्वत:ला काय करायचे आहे ते तुम्ही ठरवा. सकारात्मक वृत्ती ही यशस्वी होण्याची गुरूकिल्ली आहे,” असे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात पर्यावरण आणि स्त्रिया-मुले या विषयी उद्योजिका चित्रलेखा वैद्य म्हणाल्या , “”गेल्या काही वर्षांपासून पिकांवर मोठ्या प्रमाणावर विषारी किटकनाशके फवारली जात आहेत. त्यामुळे भाज्या, धान्य यासह जमीन, पाणी सर्वच विषारी होत आहे. त्याचे परिणाम महिलांच्या आणि मुलांच्या आरोग्यावर होत आहेत. महिलांनी प्लॅस्टिक मुक्त पॅकेजिंग, पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तू, सौंदर्यप्रसाधने यांसारखे व्यवसाय सुरू करावेत.” “”भावनाप्रधान महिलांमध्ये प्रचंड आंतरिक शक्ती असते. नकारात्मक विचार कराल, तर तसेच होणार. त्यामुळे अंधश्रद्धा बाळगू नका, सकारात्मक विचार करा. “कर भला तो हो भला’ हे सूत्र ठेऊन वागायला हवे,” असे वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांनी सुचवले. घरातील महिला आनंदी असेल, तर कुटुंबही आनंदात राहते, हे अनेक किस्से, पुराणातील, इतिहासातील उदाहरणे देऊन रंजक पद्धतीने त्यांनी सांगितले. मनाची ताकद वाढवण्याच्या प्रात्यक्षिकाला तनिष्कांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमासाठी पुणे, सातारा जिल्ह्यातून, शहरातून तनिष्का सदस्या उपस्थित होत्या. फुलांच्या रांगोळ्या, सोनचाफ्याच्या फुलांची भेट, सनई-सरोदच्या सुरावटीत तनिष्कांचे स्वागत करण्यात आले. माहेरवाशिणींच भेटतोय, अशी भावना कार्यक्रम संपताना तनिष्कांची होती. कृष्णा पर्लतर्फे यावेळी भेट म्हणून कुपन देण्यात आली. या कार्यक्रमासाठी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि सोहम उद्योग यांचे प्रायोजकत्त्व होते.

———-
फोटो क्रमांक 32394
ओळ ः मुकुंदनगर ः तनिष्का व्यासपीठातर्फे “तनिष्का संवाद 2019” हा कार्यक्रम महाराष्ट्र मंडळाच्या सकल ललित कलाघर येथे साजरा झाला. “सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांच्यासह तनिष्का सभासद आणि मान्यवर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*