स्त्रीप्रतिष्ठेची गुढी उभारून सात वर्षांपूर्वी तनिष्का व्यासपीठाची सुरवात झाली. तनिष्कांच्या उपक्रमांतून ती गुढी कायम उंचावलेलीच आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून संघटित झालेल्या स्त्रीशक्तीने राज्यात विविध स्वरूपाची मोठी कामे उभी केली. करीत आहेत. उमरग्यापासून गडहिंग्लजपर्यंत आणि अलिबागजवळच्या झिराडपासून भंडाऱ्यातील साकोलीपर्यंतच्या तनिष्का सामाजिक परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. राज्यभर तनिष्कांमध्ये कामाविषयीची तळमळ, उत्साह आणि काहीतरी बदल करण्याची उर्मी मात्र एकसारखी आहे, असे लक्षात आले. एक लाख स्त्रियांपर्यंत पोहचलेल्या तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून 15 हजार यशोगाथा साकार झाल्या. लाखो स्त्रियांवर या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम झाला. स्त्रियांना भेडसावणाऱ्या असुरक्षिततेच्या प्रश्नावर त्या एकत्र आल्या. शारीरिक, भावनिक, आर्थिक अशा तीन प्रकारच्या असुरक्षिततेशी सामना करावा लागणाऱ्या स्त्रिया वैयक्तिक, सामाजिक प्रश्नांवर बोलत्या झाल्या आणि कर्त्याही झाल्या. या काळात त्या एकट्या नव्हत्या. त्यांना पाठबळ देण्यासाठी तनिष्कांचा गट , अन्य सदस्या होत्या. याशिवाय सरकारी अधिकारी, पोलिस, नगरपालिका, महापालिका, स्वयंसेवी संस्था, बॅंका यांचे सहकार्य मिळाले. मुख्य म्हणजे शेकडो कामात त्या लोकसहभाग मिळवण्यात यशस्वी झाल्या. तनिष्कांच्या कामाचे हे सर्वांत मोठे वैशिष्ट्य ठरावे. अनेक सरकारी योजना सामान्यांपर्यंत लवकर पोहचवण्यात तनिष्का आघाडीवर आहेत. अनेक गावात निर्मलदूत, स्वच्छतादूत , जलदूत म्हणून त्या भूमिका बजावत आहेत. स्वच्छ महाराष्ट्राची ब्रॅड ऍम्बॅसिडर वाशिमच्या संगीता आव्हाळे या तनिष्का आहेत. “आमचा गाव, आमचा विकास’ सारख्या योजनेत काही तनिष्का गाव पातळीवर नेतृत्व करीत आहेत.
घडली लोकसहभागाची किमया
तनिष्कांनी हाती घेतलेले उपक्रम विविध स्वरूपाचे आहेतच, पण त्याची व्याप्ती मोठी आहे. तनिष्कांनी एकत्र येऊन केलेल्या कामाचा फायदा मोठ्या जनसमुदायाला होतोय, याची हजारो उदाहरणे आहेत. त्यातील काही ठळक उपक्रम दखल घ्यावे असे आहेत. तनिष्कांना या कामांमध्ये “सकाळ’च्या बातमीदारांची साथ असते. सकाळ, साम, स्वतंत्र वेबसाईटमधील प्रसिद्धीचं पाठबळ आहे. संपर्कासाठी कॉल सेंटरची सोय आहे. प्रशिक्षण कार्यक्रम आहेत. अनेक मोठ्या संस्था, तज्ञमंडळी “सकाळ’बददलच्या आपुलकीतून तनिष्कांना सहकार्य करण्यास तयार झाली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने राज्यातील काही गावे दत्तक घेतली आहेत. तनिष्कांच्या मदतीने त्या गावांचा कायापालट सुरू आहे. सकाळ रिलिफ फंडाच्या माध्यमातून तनिष्कांनी केलेली शिफारस आणि इतर निकषांवर सुमारे 350 गावांत गाळ काढण्याची कामे झाली, त्यातून हजारो कोटी लिटर पाण्याची साठवणक्षमता निर्माण झाली. या गावांतील टंचाई दूर होण्याबरोबरच लोकसहभागाची चळवळच उभी राहिली. गावागावात मिळून हजारो ग्रामस्थ सहभागी झाले. लोकवर्गणी, इंधनाची मदत, श्रमदान या सगळ्याचे एकत्रित मूल्य किमान 100 कोटी होईल. पाणलोट विकासाची जोड या कामांना दिल्याने या गावांची शेती फुलत आहे. अर्थकारण बदलल्याचे पाहायला मिळेल. तनिष्कांनी गाळ काढतानाचा मुरूम वापरून तीन ठिकाणी एक ते तीन किलोमीटरचे रस्ते तयार केले. त्या त्या गावांचे विकासाचे ते रस्तेच झाले. जळगाव जिल्ह्यातील पेंडगावमध्ये सलग 32 वर्षे सुरू असलेला टॅंकर बंद झाला. यानिमित्ताने तनिष्कांना, ग्रामस्थांना काही गावांतील जुने वाद मिटवण्यात यश आले. कावळवाडी ( ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील रस्त्याचा 66 वर्षे सुरू असलेला वाद संपला. जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष गावाकडे गेले. त्यांनी गावाला भेट देण्याबरोबरच रस्त्यासाठी आठ लाख रूपये मजूर केले. गावाला सौरदिवे मिळाले. चिचोंडी ( ता. येवला, जि. नाशिक) येथे 25 वर्षे रखडलेला पाटरस्ता तनिष्कांच्या पुढाकाराने पूर्ण झाला. पाचशे शेतकऱ्यांना त्याचा रोजचा फायदा झाला. बीड जिल्ह्यात श्रीपतरायवाडीत पाण्याचा ताळेबंद (बजेट) मांडला तनिष्कांनीच…पाणी आणि प्रगतीचे नाते तनिष्कांच्या पुढाकाराने फुलत आहे. सरकारच्या जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी उपक्रमांत त्या सक्रिय सहभागी झाल्या .
जीवनदान…..आरोग्यभान
तनिष्का सदस्यांसाठी आयोजित केलेली आरोग्यशिबिरे राज्यातील स्त्री आरोग्याचे वास्तव सांगणारी आहेत. 70 हजार तनिष्कांच्या
आरोग्य तपासणीखेरीज तेवढ्याच अन्य स्त्रियांच्या तपासणीतून हिमोग्लोबीनच्या कमतरतेचा प्रश्न समोर आला. तज्ञ डॉक्टर मंडळींच्या सहभागाने त्यावर मात करण्यासाठी कल्पक उपक्रम राबवण्यात आले. मोफत तपासणीत सुमारे पन्नासजणींना कर्करोगापासून वाचवण्यात यश आले. दहा हजार तनिष्कांच्या कुटुंबियांच्या मोतीबिंदूच्या तपासणीत खानदेशात वेगळे निरीक्षणही आढळले. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, बोऱ्हाडीत , जळगावातील पाचोरा, भडगाव येथे पाण्यातील क्षारांमुळे डोळ्यांचे, पोटाचे आजार वाढल्याचे समोर आले. सरकारी आरोग्य यंत्रणेला यापूर्वी त्याची कल्पना नव्हती. तनिष्कांमध्ये आरोग्यभान वाढले, त्याचबरोबर भगिनीभावही. एखादीला कर्करोग झाल्याचे लक्षात आल्यानंतर धीर द्यायला, मदतीला इतर तनिष्का सदस्या पुढे येतात. एखाद्या गरजू रूग्णाला रक्ताची, आर्थिक मदतीची गरज असेल, तर तनिष्का सोशल मिडियाचा प्रभावी वापर करतात.
शोध जगण्याच्या नव्या दिशांचा
शहरात, ग्रामीण भागात काहीतरी रोजगार मिळावा, सुरू करावा , अशी मागणी तनिष्कांकडून सातत्याने पुढे येते. विविध प्रशिक्षण कार्यक्रम, बॅंक अधिकाऱ्यांचे सहकार्य, नाबार्ड, आत्मासारख्या योजनांमुळे वेगवेगळे कल्पक व्यवसाय सुरू झाले. किमान पाच हजार तनिष्का यामुळे स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. शेळीपालनातून चांगली कमाई करणाऱ्या तनिष्कांची संख्या वाढते आहे. धुळे, जळगाव जिल्ह्यातील तनिष्कांच्या गोधड्या परदेशात पोहचल्या. विदर्भात लहान गावांच्या नावाचा तनिष्कांच्या घरगुती पदार्थामुळे जणू ब्रॅंड झाला. दर्यापूर लोणचे, कोदामेंढी तांदूळ, अर्णीच्या कागदी, कापडी पिशव्या, हिंगणा चॉकलेट, नागपूरमध्ये नंदनवन भागातील फराळाचे पदार्थ, खानदेशात, नगरमध्ये केळ्याची पावडर, तिखट, नाचणीचे पापड, हातशेवईने तनिष्कांना आर्थिकदृष्ट्य सबल केले. प्रदर्शनाच्या माध्यमातून एकत्र येऊन मार्केटिंगचा अनुभव घेणाऱ्या तनिष्कांची संख्या राज्यभर वाढते आहे. नाशिकमध्ये महिन्यातून दोनवेळा भरणाऱ्या हाट बाजारात 40 ते 50 तनिष्का महिन्याला 8 ते 10 हजार रूपये कमवतात. नव्या मुंबईतील सीवूड भागात तनिष्कांनी सुरू केलेल्या स्नॅक्स सेंटरने तनिष्कांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले आहे. प्रशिक्षणानंतर शिवणकामातून घरखर्चाला हातभार लावणाऱ्या तनिष्कांची संख्या बीड, जळगाव, कोल्हापुरात मिळून चारशे आहे. पानवडी(पुणे)त वीस तनिष्कांनी जलक्रांतीनंतर इको-ऍग्रो टुरिझम सुरू केले.
पर्यावरणाची जपणूक
तनिष्कांनी गेल्या राज्यात सुमारे चार लाख झाडे लावली. त्यातही वेगळेपण जपले. लक्ष्मी तरूसारख्या तेलबिया देणाऱ्या झाडाचा प्रसार तनिष्का करतात. वटपौर्णिमेला दरवर्षी एखादी वेगळी कल्पना राबवतात. आशिया खंडातील आकाराने मोठ्या असलेल्या म्हसवे (जि. सातारा ) येथील वडाच्या झाडाची रोपे राज्यभर तनिष्कांनी लावली आहेत. नाशिक जिल्ह्यातील बिरोळे (ता. नांदगाव) चे नाव मोठे झाले आहे. तेथे तनिष्का सदस्या सरपंच, उपसरपंच असताना वाळू उपसा पूर्ण थांबवून नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. शेती फुलली. गावाचे अर्थकारण बदलले आणि स्थलांतर रोखले गेले.
शेती झाली फायद्याची
शेतीतील स्त्रियांचे कष्ट फारसे लक्षात येत नाहीत. काही गावातील तनिष्कांनी हे चित्र बदलले. भोसे, करकंब, बार्डी ( जि. सोलापूर)येथील तनिष्कांनी जी. फोर वाणाच्या मिरचीचे पीक घेऊन ती परदेशात पाठवून एकरी 50 हजार रूपये कमावले. पुढे कोणी फळबागा, ऊसाचे पीक घेऊन घराचे आर्थिक चित्र बदलले. सोलापुरातील बोरामणीत तनिष्का सेंद्रिय शेती करून भाजीपाला मुंबईला पाठवतात. लोकमंगल बॅंकेने बोरामणीत दहा हजार रूपये 100 तनिष्कांना देऊन त्यांच्यातील उद्यमशीलतेला प्रोत्साहन दिले आहे. टाकळी सिकंदर (सोलापूर) मध्ये 40 तनिष्कांनी एकत्र येऊन डेअरी सुरू केली. गावाचे अर्थकारण बदलण्याची जिद्द त्यांच्यात आहे. जळगाव, बीड जिल्ह्यात माती परीक्षणात तनिष्कांनी स्वतःखेरीज सातशे शेतकऱ्यांना सहभागी करून कृषि आरोग्य पत्रिका तयार केली. खतांचा अनावश्यक वापर टाळून उत्पादन वाढायला मदत झाली. गट शेतीचे प्रयोगही सातारा, रत्नागिरीत झाले. शेतीतील असे निर्णय घेऊन तनिष्का आर्थिक पत आणि प्रतिष्ठा मिळवत आहेत.
प्रत्यय संवेदनशीलतेचा , सहवेदनेचा
जळगाव जिल्ह्यातील कंडारीत तनिष्कांनी अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी चारशे घरे उभारण्यासाठी सलग दोन वर्षे कष्ट घेतले. सुमारे दोन ते अडीच हजार जणांना हक्काचा निवारा मिळाला. खडकेसीम (ता. एरंडोल, जळगाव), मातोरी (बीड)त मिळून सव्वातीनशे घरांवर स्त्रियांचे नाव हक्क म्हणून लागले. पाचोरा(जळगाव)येथे तनिष्का सल्ला केंद्र चालवतात. त्या माध्यमातून 52 कुटुंब मोडता मोडता सावरली. जळगाव, पुण्यात मिळून सहा बालविवाह रोखण्यात तनिष्कांना यश आले. हगनदारीमुक्त गाव करताना तीन तनिष्कांनी प्रसंगी मंगळसूत्र विकले. बोरामणी, केकतउमरा (वाशिम), टाकळीसिकंदर येथे किमान आठशे वैयक्तिक स्वच्छतागृह तनिष्कांच्या पुढाकाराने उभारली. आरोग्याच्या समस्या तर त्यामुळे सुटल्याच, पण स्त्रीसुरक्षितता आणि स्त्रीप्रतिष्ठा मिळवून दिली. दाभाडी (यवतमाळ), तुंग( सांगली), वसंतनगर तांडा(बीड), चिचोंडी( नाशिक) अशा सात- आठ गावात दारूबंदीची जोरदार मोहीम तनिष्कांनी हाती घेतली. कोल्हापुरात साखर कारखाने असलेल्या भागात वाहनांना रिफ्लेकटर लावून वर्षभरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले. रस्ते, पाणी, रेशन आदी नागरी प्रश्नांची सोडवणूक झाल्याची अक्षरशः शेकडो उदाहरणे आहेत. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची तर काही गावात प्रथाच पडली आहे.
या सगळ्या कामांमुळे तनिष्का व्यासपीठाच्या उपक्रमाची उत्सुकता देश पातळीवर आहे, तशी जगातही. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर याबाबत आवर्जून विचारतात. म्हणूनच संघटित झालेल्या स्त्रीशक्तीसाठी नेतृत्व, क्षमता विकासाचे कार्यक्रम राबवत आहोत. तनिष्कांच्या माध्यमातून आकाराला आलेल्या उपक्रमांतून त्यांची कर्तबगारी समोर आली. सकारात्मक , परिणाम घडवणारा गट म्हणून तनिष्कांची ओळख आहे. समाजोपयोगी कामामुळे स्त्रियांना तनिष्का व्यासपीठाच्या कामातून प्रतिष्ठा मिळाली आहे. या उपक्रमांत महाराष्ट्रातील स्त्रियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करीत आहे.
दृष्टीक्षेपात….
- जलयुक्त शिवार आणि रिलिफ फंडाच्या माध्यमातून पानवडीत (ता. पुरंदर, जि.पुणे)साठवण क्षमता वाढली. गाव सोडून गेलेले लोक आता परतत आहेत. लोकसहभाग, सकाळ, तनिष्का आणि पर्सिस्टंटने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने केलेली मदत या सगळ्याचा “पानवडी पॅटर्न ‘ गाजतो आहे.
- बोरामणीत ( सोलापूर) तनिष्कांच्या सहभागातून राज्यातील पहिली स्त्रियांची यशस्विनी ऍग्रो प्रोड्युसर कंपनी आकाराला येत आहे. धान्याची प्रतवारी करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी सरकारचे 18 लाख रूपये अनुदान मिळाले. अनिता माळगे यांना या कामाबद्दल पंतप्रधान कार्यालयातून गौरवण्यात आले.
- ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, नगरसेविका, नगराध्यक्षपद, आमदार झालेल्या, तशी संधी मिळालेल्या सुमारे 80 तनिष्का आहेत. त्यात अहेरी (गडचिरोली), पुसद (यवतमाळ) येथील नगराध्यक्षांचा समावेश आहे.