यवतमाळ : दारव्ह्याच्या तनिष्का गटाने महिलांना उद्योग क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचे फलित म्हणून पाच बचतगटांच्या माध्यमातून विविध गृहउद्योग सुरू झाले असून त्यातील उत्पादनांच्या विक्रीची साखळीही तयार झाली आहे.
स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम तनिष्काच्या माध्यमातून होत आहे. प्रत्येक गटाने वेगवेगळे उद्योग सुरू केले. त्यात आवळा कॅण्डी, पापड, खजुराचे लोणचे, एलईडी दिव्यांच्या माळा , कागदी व कापडी पिशव्या, तीळगुळ, मसाला सुपारी, चहा मसाला इत्यादी पदार्थ तयार केले. हे पदार्थ विकून आर्थिक नफाही झाला. या सर्व पदार्थांमध्ये अॅड. वैशाली हिरे यांच्या बचतगटाच्या खजुराच्या लोणच्याला मागणी वाढली. दर महिन्याला दारव्हा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, औरंगाबाद व नांदेड या ठिकाणी हे लोणचे पाठवले जाते.
सात वर्षांपूर्वी येथे 10 तनिष्कांचा गट कार्यरत झाला. आता ही संख्या वाढली आहे. जागतिक महिला दिनाच्या दिवशी बारा तनिष्कांनी वेगवेगळ्या ठिकाणी महिला सक्षमीकरणाविषयी व्याख्याने दिली. दोन गावांमध्ये नाला खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामात सहभाग नोंदविला. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहिमेत भाग घेतला, तसेच पावसाळ्यात तब्बल 40 हजार सीडबॉल तयार करून वृक्षारोपणाचेही कार्य केले. महिलांवरील अत्याचारांबाबत जनजागृती करण्यासाठी शाळाशाळांमध्ये ‘पोरी जरा जपूनं’ हा मार्गदर्शनपर उपक्रम राबविला. सोबतच वर्षातून एकदा ‘तनिष्का जल्लोष’ च्या माध्यमातून महिलांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. या गटाच्या प्रमुख डॉ. संगीता घुईखेडकर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली तनिष्कांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
…………………………………….
