“दोन तास गावासाठी’ .. वळसंग झाले जलयुक्त

 

श्‍याम जोशी
सोलापूर,  ः गेल्या दहा वर्षापासून पावसाने पाठ फिरवल्याने गावातील प्रत्येकजण पाण्यासाठी हैराण झालेला. प्रत्येकाला पिण्याचेच नव्हे तर  वापरण्यासाठीही विकत घ्यावे लागे. अनेकांनी घर अन्‌ शेतीपासून फारकत घेत गाव सोडून शहरात ठाण मांडलं. बागायतदारांचं गाव ही ओळख इतिहासजमा होतीय अशीच जणू स्थिती. अशा या  परिस्थितीत  तनिष्कांनी  ग्रामस्थांना  आशेचा किरण दाखवला अन्‌ मग सुरू झाली “दोन तास गावासाठी’ ही श्रमदान चळवळ.

या चळवळीने अनेक संस्था, व्यक्तीसह गावातील प्रत्येकाला जोडून घेत एक व्यापक मोहीम राबवली. एक वर्षाच्या मेहनतीतून 38 एकर क्षेत्रातील एका भल्या मोठ्या तलावातील गाळ काढला अन्‌ पावसाने साथ दिल्याने तलाव तुडूंब भरला अन्‌  गाव पाणीदार बनलं.

ही कथा आहे सोलापूर जिल्ह्यातील वळसंग (ता.दक्षिण सोलापूर) गावची. सोलापूरहून अक्कलकोटला जाताना वीस किलोमीटरवर हे गाव आहे. प्रत्येकाचा परंपरागत शेती हाच व्यवसाय.  कोणतीही नदी नाही किंवा सिंचन योजना नाही त्यामुळे शेती अन्‌ पिण्यासाठी पावसावरच अवलंबून राहवे लागते. दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई ही पाचवीला पुजलेलीच. गेल्या दहा वर्षापासून तर पावसाने दडी मारल्याने फक्त उन्हाळ्यातील टंचाई आता तिन्ही ऋतूत होती. त्यामुळे शेती व्यवसायाला ग्रहण लागलेले. पूर्वी निदान पावसाळ्यात थोडाफार तरी पाऊस पडत असे त्यामुळे आठमाही पाणी चांगले असे आता मात्र बारमाही पाणीटंचाईची स्थिती . त्यामुळे अनेक शेतकरी , त्यांची मुलं रोजारोटीसाठी शहर जवळ करू लागले होते. त्यामुळे गावाची रयाच गेलेली. पुरूष बाहेर पडले तरी महिलांनी मात्र  उपाय शोधण्याचे काम सुरू केले. ‌ त्यांना सकाळाच्या तनिष्का व्यासपीठाची माहिती मिळाली. तनिष्कांचा गट स्थापन करत या महिलांनी कामाला सुरवात केली. त्यातूनच त्यांना गावातील काही तरूणांची साथ मिळाली अन्‌ त्यातून श्रमदान चळवळीला सुरवात झाली. गेल्या एक वर्षापासून अव्याहत सुरू असलेल्या या चळवळीने “दोन तास गावासाठी’ या उपक्रमात अनेकांना जोडून घेतले. हुतात्मा जलसंवर्धन समितीची स्थापना झाली. तनिष्कांच्या मागणीनुसार सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रूपये तलावातील गाळ काढणे व खोलीकरणासाठी मिळाले. “सकाळ’च्या आवाहनामुळे अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने एक लाख रूपये दिले. तसेच अन्य संस्था व व्यक्तींनीही मदतीचा ओघ सुरू ठेवला. त्याचा परिणाम  38 एकर क्षेत्रातील गाळ  काढण्यात झाला.  नुसता गाळच नव्हता तर मुरूमही होता तो  नव्याने होत असलेल्या सोलापूर अक्कलकोट  रस्ता बांधणीच्या कामासाठी वापरण्यात आला. तलावाच्या खोलीकरणाचे काम चांगले झाले. आता पाऊस पडणे अपेक्षित होते.  अखेर  सप्टेंबरमधे थोडा पाऊस झाला . एक दिवस  जोरदार वृष्टी झाली . तलावाचे रूपच पालटून गेले. खोलीकरणामुळे तलावात पाणीसाठा चांगला झाला. हे पाणी पाहण्यासाठी तनिष्कांसह श्रमदान चळवळीतील प्रत्येकजण तलावावर धावला. पाणी पाहून प्रत्येकाने अनंदोत्सव साजरा केला.  पाण्याचा सदुपयोगच व्हावा यासाठी डोळ्यात तेल घालून काम सुरू आहे. तलावातील पाणी गावाची तहान भागवणारे तर ठरलेच मात्र  परिसरातील अनेकांच्या विहीरी व कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली .आहे. .

तलावाजवळ  चारशे झाडांची लागवड
जलसंवर्धन समिती अन तनिष्कांनी आता तलावाशेजारील जागेत 400 वृक्षांची लागवड केली आहे. सर्व झाडे दीर्घकाल टिकणारी व औषधी गुणधर्माची आहेत. यामधे विशेषतः वडाची 100 झाडे आहेत. अन्य पिंपळ, गुलमोहर, बेल  आहेत.

दहा हजार सीडबॉल पेरले
वळसंगमधील विविध शाळातील विद्यार्थ्यांकडून सीडबॉल तयार करून ते जंबाळी तलावाजवळील जागेत पेरले. त्यातील काही झाडे नक्कीच जगतील..येथे पंचवटी बनवत शुध्द हवा देणारी झाडे लावली जात आहेत.  “ऑक्‍सिजन पार्क’ तयार केले जाणार आहे. त्यामुळे गावाल निरोगी बनवण्याचा संकल्प वर्षपूर्ती सोहळ्यात सर्वांनी केला.

नाशिकच्या कृषी प्रदर्शनात झाला गौरव
या सर्व कामामुळे हुतात्मा जलसंवर्धन समितीला नाशिक येथील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात “आदर्श जलसंवर्धक’ म्हणून गौरवण्यात आले.  श्रमदानाला एक वर्ष (2018-19) पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी वर्षपूर्ती कार्यक्रम घेतला. चळवळीतील सर्व सदस्य व तनिष्कांचा गटविकास अधिकारी राहूल देसाई यांच्या हस्ते सत्कार केला.
श्रमदान चळवळीत यांचाही सहभाग
माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कोल्हापूर माहापालिकेचे आयुक्त व वळसंगचे सुपुत्र डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, तनिष्का गटप्रमुख प्रतिभा दुधगी, दिनकर नारायणकर, पार्श्वनाथ खोबरे, सादिक पटेल, श्रीकांत कलशेट्टी, विरेश बागलकोटी, पार्श्वनाथ खोबरे, सुनिल भैरामडगी, अन्वर तडमुड, बसवराज दुधगी, परशुराम चौगुले, अजय काळे, मनिषा मणुरे, सविता बागलकोटी, संगीता दुधगी, शैला माणकोजी, सविता घागरे, निलव्वा जिड्डीमनी, बसम्मा मणूरे, वैशाली दुधगी, सावित्री ठिसके, दिपा तोळणुरे, भागीरथी बिराजदार, गीता मोटगी, रवी बागलकोटी, योगेश चनशेट्टी, संजय मणुरे, लिंगराज दुधगी,  रहिम कटरे, विनायक सुरपुरे, सुरेश दुधगी, कुर्ले सावकार, पंकज स्वामी, धनराज बाबानगरे, हारुन अमलिचुंगे, अरविंद मोटगी, सरोजनी दुधगी यांनी श्रमदानाला येणा-या लोकासांठी पाणी व नाष्टाची सोय केली. तलाव परिसरात लावलेल्या झाडांना पाणीटंचाईच्या काळात श्रीनाथ कलशेट्टी यानी स्वत:च्या टॅकरने  पाणी  घातले.. पार्श्वनाथ खोबरे व श्रीनाथ कलशेट्टी हे झाडाना जगविण्याची जबाबदारी  पार पाडतात..
—————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*