ओझर्डेच्या मसाल्यांना दिल्लीतही दाद

लक्ष्मण चव्हाण
सातारा, ः ओझर्डे (ता. वाई) येथील तनिष्का सदस्यांनी एकत्र येऊन सुरू केलेलया मसाल्यांना सातारा, पुणे, मुंबईनंतर दिल्ली, हरियाणातही पसंतीची पावती मिळाली. गेल्या चार वर्षात मसाल्यांच्या व्यवसायाने आता गती घेतली आहे.
तनिष्का सदस्यांपैकी बहुतेकजणी शेतकरी कुटुंबातील गृहिणी. पण एखादा व्यवसाय सुरू करायचा होता. हाताला चव आहे, या आत्मविश्‍वासाने वेगवेगळे मसाले करायचे ठरवले. दिवाळीला साड्या न घेता प्रत्येकीने तीन हजार रूपये सुरवातीचे भांडवल म्हणून गोळा केले. तयार झालेले मसाले ओळखीचे लोक, पै पाहुण्यांना दिले. संक्रांतीला वाण म्हणूनही गावात वाटले. या मसाल्यांना गावातील महिलांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. यात्रेत विक्रीसाठी ठेवले. सुरवातीला मटण, चिकन, बिर्याणी, पावभाजी असे मसाले तयार करत असताना सध्या कोकणी, मिसळ, सांबर, छोले, अंडाकरी,काजुकरी, चाट , गोडा मसाला, शाही पनीर , कांदा लसूण मसाला, हळद पावडर असे विविध मसाले आकर्षक पॅकिंगमध्ये संस्कृती या नावाने त्या बनवू लागल्या आहेत. नवीन वजनकाटा, मिक्‍सरवर काम करता करता आत्ता नव्याने मसाले मिक्‍सिंग मशिन व आधुनिक पॅकिंगचे मशिन खरेदी करुन व्यवसायात मोठ्‌या प्रमाणात त्यांनी वाढ केली आहे. नायगाव येथे सावित्रीबाई फुले जयंतीदिनी व साताऱ्यात मानिनी जत्रा, वाई व लोणंदला कृषी प्रदर्शनात स्टॉल उभारले. शासनाच्या “उमेद’च्या माध्यमातून मुंबईत सरस प्रदर्शनात स्टॉल उभारण्याची संधी मिळाली. या प्रदर्शनात दिल्ली येथे होणाऱ्या सरस आजिविका प्रदर्शनासाठी ओझर्डेच्या गटाची निवड झाली. दिल्लीत मसाल्यांच्या आकर्षक पॅकिंगसाठी प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. शिवाय हरियाना येथील प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. परराज्यात त्या प्रथमच गेल्या. या संधीनंतर तनिष्कांच्या मसाल्याचा दरवळ आता दूरपर्यंत पसरला आहे.लांबच्या ठिकाणी कुरिअरचा वापर करतात. त्याचबरोबर ऑनलाईनही विक्री होते. तसेच तनिष्कांनी नेटबॅंकिगचे प्रशिक्षण घेतले.

एकत्र आल्यामुळे किमया
तनिष्का म्हणून आम्ही एकत्र आलो. एकमेकींच्या साथीने, विश्‍वासाने व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं. सकाळ रिलीफ फंडातून गावाची पाण्याची समस्याही सोडवायला
आर्थिक बळ मिळालं,
अंजली सुतार, तनिष्का सदस्या

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*